Wednesday, May 7, 2008

कोण आहेस तु...?

मध्यानीच्या वेळी अखंड तळपणारा भास्कर आहेस तू
कि रात्रीच्या शांत नीश्चल वेळी साद घालणारा भालचंद्र आहेस तू
कोण आहेस तू..?

सतत सलत राहणारा निवडूंग आहेस तू
कि हवा हवासा वाटणारा गुलाब स्पर्श आहेस तू

पावसाआधी येणारी वा-याची झुळुक आहेस तू
कि नंतर येणारा ओल्या मातीचा गंध आहेस तू
कोण आहेस तू..?

पावसाची वाट पाहणारा चातक आहेस तू
कि मनमोहक नृत्य करणारा मोर आहेस तू

वास्तवाचा मखमली स्पर्श आहेस तू
कि स्वप्नांचा अविट अर्थ आहेस तू
कोण आहेस तू..?

Sunday, February 24, 2008

ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो
लाभला चंद्र भर चांदण्यात ओरडलो ।

चालता चालता जरा काय धडपडलो
दगडास वाटले त्याच्या पायी पडलो ।

हा सगंध आला पिच्छा पुरवित माझा
मी कुठे फुलांच्या मांडवात बागडलो ।

पाहुन एकदा काय हसलो व्यथेला
मी व्यथेस माझ्या कायमचा आवडलो ।

पाऊस असा का आला तैसा गेला
मी जणू सांत्वना घेण्यासाठी रडलो ।

मी दिसलो नाही एकांतात कुठेही
माणसात आलो मजला मी सापडलो ।

तु पुस्तक माझे उघडलेस की
मी गुंतत गेलो, तुजला जैसा उलगडलो ।

Saturday, February 2, 2008

बी

काहीच बीया रुजतील,
काही पक्षी खातील,
काही दगडावरच सुकतील ....कुजतिलही,
काही पाण्यात पडुन काहींची झाडेही होतील,
काही रोपं तुडवली जातील,
आळ्या-किडे पानन पान खातील,
खुडतीलही कोणी गंमत म्हणुन,
कुठं उगवायचं.... कसं जगायचं
हे का बी ला ठरवता येतं?
जगातल्या शंभारापैकी एखाद्याच रोपाला
पूर्णपणे फुलता येतं,
झाडांच स्वप्न बी मधे झोपलेलं असतं
तसंच प्रत्येक बी त एक झाड लपलेलं असतं.......

Monday, January 28, 2008

कविता म्हणजे. . . . . . . .

कविता म्हणजे मनाचा हुंकार
कविता म्हणजे भावनेचा अविष्कार
कविता म्हणजे ह्र्दयाचा झंकार
कविता म्हणजे आत्म्याचा चमत्कार
कविता म्हणजे चित्राचा आकार
कविता म्हणजे शब्दांचा होकार
अस्पष्ट वास्तवाचा थोडासा फेरफार
उत्तर रात्रींच्या स्वप्नांचा अलगदसा भार
शब्दांच्या ओळी अनं विचारांचे सार. . . .

तारे जमीन परं............

नवर्‍याला दोन अंड्यांचं आँम्लेट, मोठ्या मुलालाही तसंच नि धाकट्याला मात्र एकाचंच, साधं, मिर्ची न घालता.
प्रत्येक फुटलेल्या अंड्याबरोबर वाढत जाणारा घड्याळाचा वेग, आईची धांदल
हे सगळं ईशानसारखं थंडपणे सहज पकडणारा दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इ.
नि माझे अडखळलेले शब्द.


तीन गुणिले नऊ बरोबर?
कुणाला तीन असं लिहून जग सोडाच पण विश्व जिंकल्याचा आनंद.
त्यामागचा तर्क बघून आम्ही अवाक
नि तोंडात मारल्यासारखेसत्तावीसवर
माझे अडखळलेले शब्द.


बेधडक रस्ता क्राँस करताना अडखळणार्‍या प्रत्येक टँक्सीच्या ब्रेकसह चुकलेला ठोका
नि न अडखळता चालणारा ईशान
भरधाव धावणारी डबल‍ डेकर
नि माझे अडखळलेले शब्द.


"तुम्हें सब है पता" नि "मेरी माँ" यांच्यामध्ये थांबलेला तो क्षण
नि काठाशी येऊन थबकलेलं पाणी
"मेरी माँ" म्हणताच फुटलेले बांध
नि माझे अडखळलेले शब्द.


"मुहल्ले की रौनक गलियाँ हैं जैसे,
खिलने की जिद पर कलियाँ हैं जैसे"
प्रतिभेच्या कुठल्या शिखरावर मिळतात हे शब्द?
थेट हृदयाच्या तळाशी जन्माचे ठिकाण सांगणारा आनंद
नि कुणाचे कदाचित तिथूनच जन्मलेले शब्द
नि माझे अडखळलेले शब्द.


तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण त्याने अशी मिठी मारून डोळे क्वचितच भिजवले होते
नि त्याचा मित्र एवढ्या निरागसपणे खूश होणार होता?
सर्व काही न अडखळता सांडणारं, आनंद, हास्य, अश्रू
नि माझे अडखळलेले शब्द.


नावाच्या पाट्या सरकताना नि निम्मं थिएटर रिकामं होत असताना
कदाचित बहुतेकांनी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं
असेलती मुलं मात्र निखळ निरागसपणे हसत होती
"कभी बाते जैसे दादी नानी" म्हणताना मोठ्यांच्या चपला घालून ती चिमुकली चालत होती
नि काही जण मात्र जाणीवपूर्वक त्यांना पडद्यावर उभं करत होते.
कसं बारीक सारीक टिपतात काही जण
कशी आजूबाजूचीच गोष्ट नव्याने सांगतात काही जण
नि कशी नवीन दिसते ती त्यांच्या डोळ्यांतून बघताना
फक्त पहात रहावंसं वाटतं
डोळ्यांवरल्या पाण्याच्या पडद्याआडून
ते न थांबता झरणारं पाणी
एका अफाट सुंदर, अफाट निरागस नि अफाट प्रतिभेच्या जगातून बाहेर पडूच नये म्हणून चाललेली अथक धडपड

शब्दांतून कसं व्यक्त होतात त्या जगात?
माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.