नवर्याला दोन अंड्यांचं आँम्लेट, मोठ्या मुलालाही तसंच नि धाकट्याला मात्र एकाचंच, साधं, मिर्ची न घालता.
प्रत्येक फुटलेल्या अंड्याबरोबर वाढत जाणारा घड्याळाचा वेग, आईची धांदल
हे सगळं ईशानसारखं थंडपणे सहज पकडणारा दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार इ.
नि माझे अडखळलेले शब्द.
तीन गुणिले नऊ बरोबर?
कुणाला तीन असं लिहून जग सोडाच पण विश्व जिंकल्याचा आनंद.
त्यामागचा तर्क बघून आम्ही अवाक
नि तोंडात मारल्यासारखेसत्तावीसवर
माझे अडखळलेले शब्द.
बेधडक रस्ता क्राँस करताना अडखळणार्या प्रत्येक टँक्सीच्या ब्रेकसह चुकलेला ठोका
नि न अडखळता चालणारा ईशान
भरधाव धावणारी डबल डेकर
नि माझे अडखळलेले शब्द.
"तुम्हें सब है पता" नि "मेरी माँ" यांच्यामध्ये थांबलेला तो क्षण
नि काठाशी येऊन थबकलेलं पाणी
"मेरी माँ" म्हणताच फुटलेले बांध
नि माझे अडखळलेले शब्द.
"मुहल्ले की रौनक गलियाँ हैं जैसे,
खिलने की जिद पर कलियाँ हैं जैसे"
प्रतिभेच्या कुठल्या शिखरावर मिळतात हे शब्द?
थेट हृदयाच्या तळाशी जन्माचे ठिकाण सांगणारा आनंद
नि कुणाचे कदाचित तिथूनच जन्मलेले शब्द
नि माझे अडखळलेले शब्द.
तोच जिंकणार होता, हे माहितच होतं
पण त्याने अशी मिठी मारून डोळे क्वचितच भिजवले होते
नि त्याचा मित्र एवढ्या निरागसपणे खूश होणार होता?
सर्व काही न अडखळता सांडणारं, आनंद, हास्य, अश्रू
नि माझे अडखळलेले शब्द.
नावाच्या पाट्या सरकताना नि निम्मं थिएटर रिकामं होत असताना
कदाचित बहुतेकांनी त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्षच केलं
असेलती मुलं मात्र निखळ निरागसपणे हसत होती
"कभी बाते जैसे दादी नानी" म्हणताना मोठ्यांच्या चपला घालून ती चिमुकली चालत होती
नि काही जण मात्र जाणीवपूर्वक त्यांना पडद्यावर उभं करत होते.
कसं बारीक सारीक टिपतात काही जण
कशी आजूबाजूचीच गोष्ट नव्याने सांगतात काही जण
नि कशी नवीन दिसते ती त्यांच्या डोळ्यांतून बघताना
फक्त पहात रहावंसं वाटतं
डोळ्यांवरल्या पाण्याच्या पडद्याआडून
ते न थांबता झरणारं पाणी
एका अफाट सुंदर, अफाट निरागस नि अफाट प्रतिभेच्या जगातून बाहेर पडूच नये म्हणून चाललेली अथक धडपड
शब्दांतून कसं व्यक्त होतात त्या जगात?
माझा शब्दातीत dyslexia
अर्थात माझे अडखळलेले शब्द.
Ink's song
8 years ago
3 comments:
nice. keep it up. The gap between to blog is too much
we are missing a lot
good one.
this is ur ultimate creation no doubt!!!priceless
Post a Comment