Sunday, February 24, 2008

ना छचोर हळव्या शब्दांसाठी अडलो
लाभला चंद्र भर चांदण्यात ओरडलो ।

चालता चालता जरा काय धडपडलो
दगडास वाटले त्याच्या पायी पडलो ।

हा सगंध आला पिच्छा पुरवित माझा
मी कुठे फुलांच्या मांडवात बागडलो ।

पाहुन एकदा काय हसलो व्यथेला
मी व्यथेस माझ्या कायमचा आवडलो ।

पाऊस असा का आला तैसा गेला
मी जणू सांत्वना घेण्यासाठी रडलो ।

मी दिसलो नाही एकांतात कुठेही
माणसात आलो मजला मी सापडलो ।

तु पुस्तक माझे उघडलेस की
मी गुंतत गेलो, तुजला जैसा उलगडलो ।

Saturday, February 2, 2008

बी

काहीच बीया रुजतील,
काही पक्षी खातील,
काही दगडावरच सुकतील ....कुजतिलही,
काही पाण्यात पडुन काहींची झाडेही होतील,
काही रोपं तुडवली जातील,
आळ्या-किडे पानन पान खातील,
खुडतीलही कोणी गंमत म्हणुन,
कुठं उगवायचं.... कसं जगायचं
हे का बी ला ठरवता येतं?
जगातल्या शंभारापैकी एखाद्याच रोपाला
पूर्णपणे फुलता येतं,
झाडांच स्वप्न बी मधे झोपलेलं असतं
तसंच प्रत्येक बी त एक झाड लपलेलं असतं.......